Ad will apear here
Next
बुद्धिबळातील नवी गुणवत्ता - सलोनी सापळे
सलोनी सापळेपुण्याच्या बुद्धिबळ क्षेत्राला प्रकाशझोतात आणणाऱ्या ग्रँडमास्टर अभिजित कुंटेला आदर्श मानत आज हजारो मुले-मुली या खेळात यशस्वी वाटचाल करत आहेत. अभिजितची ही धुरा पुढे नेत पुण्याच्या सलोनी सापळे हिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’चा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळवून पुण्याचे नाव आणखी उंचावर नेण्याची कामगिरी केली आहे... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख बुद्धिबळपटू सलोनी सापळेबद्दल...
.................
स्पेनमध्ये झालेल्या ‘बार्बरा डेला व्हैलोस’ बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या फेरीत सलोनी सापळेने पेरू देशाचा इंटरनॅशनल मास्टर फिलोमॉन क्रूझशी बरोबरी केली आणि नॉर्म मिळवला.  सलोनी सापळेचे आताचे रेटिंग २१४५ असून या स्पर्धेत ती ४.५ गुणांसह ४२व्या स्थानावर राहिली. अर्थात हा क्रमांक फार आशावादी नसला, तरी ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’चा नॉर्म मिळाल्याने तिचे पहिले ध्येय निश्चितच पूर्ण झाले आहे. सलोनीने मागील वर्षी स्पेनमधीलच माँटकाडा आणि सेंट मार्टी येथील स्पर्धांमध्ये दोन नॉर्म मिळवले होते. हा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळविण्यासाठी तिला खूप वाट पाहावी लागली; पण अखेर जिद्दीच्या जोरावर तिने हा नॉर्मही मिळवला.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेली सलोनी आंतरराष्ट्रीय मास्टर प्रथमेश मोकल यांच्याकडे सराव करते. २०१६ ते २०१८ या कालावधीत तिने एकंदर तीस स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये तीन विजय, नऊ बरोबरीत तर दहा वेळा पराभव अशी तिची कामगिरी राहिली आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तिने सातत्याने यशस्वी कामगिरी केली आहे. अनेक पुरस्कार आणि पदके मिळवणाऱ्या सलोनीचे स्वप्न वुमन इंटरनॅशनल मास्टरचा नॉर्म मिळवण्याचे होते आणि यंदा तिने ते पूर्ण केले. प्रथमेश मोकलसारखा नामांकित खेळाडू तिचा प्रशिक्षक असल्याने तिच्या खेळातील कमकुवत दुवे शोधून त्यावर सुधारणा करणे व कोणत्याही स्थितीत आपली एकाग्रता भंग होऊ नये याची काळजी घेणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी सलोनीला शिकायला मिळत आहेत.

‘आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ स्पर्धे’त भारताने सहापैकी चार पदके मिळवली त्यातही सलोनीचा महत्त्वाचा वाटा होता.  या स्पर्धेत सलोनीने के. कृतिगा या मानांकित खेळाडूचा सहज पराभव केला होता आणि याच तिच्या कामगिरीची दखल भारतीय बुद्धिबळ जाणकारांनी घेतली होती. त्यानंतर तमिळनाडूत झालेल्या सबज्युनियर गटाच्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत सलोनीने तामिळनाडूच्याच यु. अश्विनीशी बरोबरी साधत एलो रेटिंगमध्ये वरची पातळी गाठली. ‘आशियाई ज्युनिअर विजेतेपद स्पर्धे’त सलोनीला फारसे यश हाती लागले नाही, मात्र मोठ्या व्यासपीठावर खेळताना अशा चुका होतात आणि त्या सराव करताना कशा सुधारायच्या असतात याचा धडा मात्र तिला या स्पर्धेत मिळाला. रिंधिया व्ही. या खेळाडूसोबतच्या या स्पर्धेत तिला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

सलोनीचे फिडे एलो रेटिंग आता २१४५ झाले असून ती आता ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ म्हणून ओळखली जाईल. तिचे सर्वोत्तम एलो रेटिंग २३११ होते, मात्र त्यानंतर काही स्पर्धांमधील अपयशाने तिचे रेटिंग घसरले. त्यानंतर मात्र तिने सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक हौशी बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक मिळवले व पुन्हा एकदा एलो रेटिंगमध्ये सुधारणा केली.  या स्पर्धेतील तिच्या कामगिरीमुळे तिचा आत्मविश्वास उंचावला व पुन्हा एकदा जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत तिने सरस आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली.

आतापर्यंत सलोनीने जवळपास दीडशे स्पर्धा खेळल्या असून त्यातील यशाची टक्केवारी जवळपास साठ आहे. अजून तिला खुप मोठी आव्हाने पार करायची आहेत. आता ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ बनल्याने तिच्यावरची जबाबदारी वाढली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि त्याबरोबरच होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्पर्धांमध्ये तिला सहभागी व्हायचे आहे. केवळ सहभागीच व्हायचे असे नाही, तर तिला त्यात यशही मिळवायचे आहे.  तिचे प्रशिक्षक प्रथमेश मोकल तिच्या खेळाबाबत खूपच आशावादी आहेत आणि सध्या सरावादरम्यान ते तिचे कच्चे दुवे शोधून त्यात कशी सुधारणा करता येईल, यासाठी तिला मार्गदर्शन करत आहेत.

इशा करवदेनंतर कित्येक वर्षांनी पुण्याच्या सलोनीने हा नॉर्म मिळवला आहे. तिची वाटचाल आणि ती खेळत असलेली स्पर्धांची संख्या पाहता, तिची आणखी प्रगती होणार हे स्पष्ट दिसत आहे. स्वतः सलोनीचे स्वप्न आहे ते म्हणजे पुण्याची आणि पर्यायाने भारताची आणखी एक वुमन ग्रँडमास्टर बनण्याचे. मात्र यासाठी तिला भारतातच दक्षिण भारतीय खेळाडूंचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. भारतीय बुद्धिबळ क्षेत्रावर अगदी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदपासून पी. हरीकृष्णापर्यंत अनेक नामवंत खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले आहे. द्रोणावली हरीका, आर. वृषाली या खेळाडूदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. सलोनीला जर तिचे ग्रँडमास्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर तिला या खेळाडूंच्या तोडीस तोड खेळ करावा लागेल. सलोनीची गुणवत्ता आणि जिद्द पाहता ती यात निश्चित यशस्वी होईल याची खात्री वाटते.

- अमित डोंगरे
ई-मेल: amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZYGBR
Similar Posts
चौसष्ठ घरांचा नवा राजा ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न बुद्धिबळातला प्रत्येक खेळाडू पाहतो; मात्र त्यात खूप कमी जण यशस्वी होताना दिसतात. पुण्याचा अभिमन्यू पुराणिक याने आपले हे स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्राचा सातवा, तर पुण्याचा तिसरा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकबद्दल
‘वुमन ग्रँडमास्टर’ होण्याची ‘आकांक्षा’ बुद्धिबळातल्या चौसष्ट घरांचे आकर्षण आकांक्षाला लहानपणापासूनच होते. याच ओढीने वयाच्या सातव्या वर्षापासून ती बुद्धिबळाचे प्राथमिक धडे गिरवू लागली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोळा वर्षांखालील स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणेबद्दलचा
उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश... फुटबॉलमध्ये परेश शिवलकर हे नाव केवळ पुण्यातच नाही, तर राज्य पातळीवरदेखील आता नवीन राहिलेले नाही. एक फुटबॉलपटू म्हणून जितकी अविस्मरणीय कारकीर्द त्याने गाजवली आहे, तेवढाच आज एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी ठरत आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक परेश शिवलकरबद्दल...
वेगाची नवी राणी : ताई बामणे नाशिकची नवोदित धावपटू ताई बामणे हिने युवा ऑलिंपिकला पात्र ठरत भारताची नवी वेगाची राणी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असून बँकॉक येथे झालेल्या पात्रता फेरीत तिने पंधराशे मीटर अंतराच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले आणि युवा ऑलिंपिकची पात्रता मिळवली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language